Friday, 12 September 2014

इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक खरच फायदेमंद असते का?

इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक खरच फायदेमंद असते का?

बचत करणे हा माणसाचा स्वभाव आहे. भारतीय बचतीसाठी विशेषकरून ओळखले जातात.  परंतु या बचत केलेल्या रकमेची योग्य प्रकारे गुंतवणूक करणे  जास्त महत्वाचे आहे.  
माणसाचे आयुष्य ही एक अनिश्‍चित अशी गोष्ट असल्याने आपल्या प्रियजनांना आर्थिक सुरक्षितता मिळावी या हेतूने विमा उतरविला जातो. अनेकदा विमा योजनांमधले खाचखळगे न तपासले जात नाहीत. विम्याच्या गुंतवणूकीकडे डोळसपणाने बघण्याची गरज आहे.
आयुष्याच्या विम्याबद्दल - कालच्यापेक्षा आज असलेली सजगता काकणभर अधिक असली, तरी आयुर्विमा उतरवताना आपण अनेक घोडचुका करत असतो. त्या कदाचित आपल्यालाही नकळत घडत असल्या, तरी त्यांचा परिणाम दीर्घकालीन आणि थेट तुमच्या प्रियजनांच्या राहणीमानाशी खेळ करणारा असू शकतो.

विमा पॉलिसी दोन प्रकारच्या असतात. एक - गुंतवणूक आणि विमा यांचे मिश्रण असलेली पॉलिसी. दोन : शुद्ध विम्याचे संरक्षण देणारी टर्म पॉलिसी. आपण विम्याला अजूनही गुंतवणुकीचे साधन मानण्याची घोडचूक करतो. विमा हा गुंतवणूकांहून खूप वेगळा आणि त्याहूनही अत्यंत महत्त्वाचा असा प्रांत आहे. आपण बव्हंशी वेळा "सर्व्हायव्हल बेनिफिट (जर पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतकाळात मृत्यू झाला नाही, तर त्याला मुदतपूर्तीच्या वेळी मिळणारी रक्कम)' देणाऱ्या विमा योजनेत गुंततो. अशा विम्याच्या योजनांमध्ये गुंतवणूक आणि विमा यांचे घातक मिश्रण असते. यामुळे तुमचा विम्याचा हप्ता प्रचंड रकमेचा आणि त्या मानाने विमा संरक्षण मात्र किरकोळ रकमेचे, अशी स्थिती निर्माण होते. आयुर्विम्याला विम्याच्याच चष्म्यातून पाहायला हवे, हे आपण विसरतो; आणि एका मोठ्या तोट्याच्या व्यवहारात उडी घेतो. आयुर्विमा द्यायचा, तर तो "टर्म' स्वरूपाचाच असला पाहिजे. आपण आपल्या गाडीचा विमा उतरवतो आणि विमा-काळात काही विपरीत घडले नाही, तर विम्याची रक्कम परत मिळत नाही. याच तत्त्वावर माणसाच्या आयुष्याला विमा संरक्षण देणाऱ्या "टर्म इन्शुरन्स' या विम्याच्या प्रॉडक्‍टची मांडणी आहे. हा शुद्ध आणि निखळ स्वरूपाचा विमा असल्याने, टर्म इन्शुरन्समध्ये हप्ता कमी रकमेचा आणि त्या मानाने विमा संरक्षण भरभक्कम रकमेचे असते. उदाहरणार्थ : 25 वर्षे वयाच्या व्यक्तीचा 35 वर्षांच्या कालावधीचा एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स उतरवला, तर त्याला वर्षाला केवळ 19000  ते 25000 रुपये हप्ता बसतो. हेच जर त्याने "एंडोवमेंट' प्रकारचा (म्हणजे सरव्हायवल बेनिफिट असलेला) प्रचंड वार्षिक हफ्ता असलेला  इन्शुरन्स काढला तर वार्षिक हफ्ता साधारण 3 ते 4 लाख येऊ शकतो. तसेच टर्म इन्शुरन्स व्यतिरिक्त दुसर्‍या विमा योजना कितीही फायदेमंद वाटत असल्या तरी माझ्या पाहण्यात कुठलीच योजना वाषिर्क 3.5% पेक्षा जास्त परतावा देत नाही.  तात्पर्य  टर्म इन्शुरन्स उतरवून आपल्या आयुष्यातील आयुर्विमा हे प्रकरण हाताळणे आणि उर्वरित रक्कम शुद्ध गुंतवणूक योजनेत गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवणे, असे आपले धोरण असायला हवे.

सी.ऐ. आनंद मुथा
anandmutha@armutha.in

No comments:

Post a Comment

TDS Rate and Provision for FY 2024-25

TDS Rates & Provisions TDS (Tax Deducted at Source) is a tax collection mechanism under the Income Tax Act, 1961, where tax is deducted...